खाकीत लपलेले गुन्हेगार ! कामटे नव्हे भामटे !
प्रतिनिधि.
सांगलीत पोलीस खात्याविषयी संताप आणि चीड आणणारी घटना घडली आहे, कामटे नावाच्या भामट्या पोलीस निरीक्षक आणि त्याच्या साथीदार पोलिसांनी अनिकेत कोथळे नावाच्या तरुणास चोरीच्या आरोपाखाली अटक केली, त्यास पोलीस कोठडीत डांबले, इतकेच काय तर कौर्याची परिसीमा गाठत थर्ड डिग्रीचा वापर करीत बेदम मारहाण केली !
त्यात त्याचा मृत्यू झाल्यानंतर प्रेत सिंधुदुर्ग जिह्यातील आंबोली घाटात नेले, तेथे प्रेत अर्धवट अवस्थेत जाळून दरीत ढकलून लावले!
त्यानंतर अनिकेत कोठडीतून पळून गेल्याचा बनाव केला?
पण कामटेची भामटेगिरी एका आठवड्यातच उघडकीस आली !
याप्रकरणी पोलीस निरीक्षक युवराज कामटे सह एकूण पाच पोलिसांना अटक करण्यात आली. पोलिसांनीच पोलिसांच्या मुसक्या आवळ्यामुळे सांगलीसह संपूर्ण महाराष्ट्रात एकदम खळबळ उडाली आहे!
आरोपीना एकूण १२ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणी एकूण १२ पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे.
या प्रकरणात डीवायएसपी दीपाली काळे हीचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप केला जातोय !
काळे बाईला सहआरोपी करा आणि पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची बदली करा, या मागणीसाठी सोमवारी सांगली बंदची हाक देण्यात आली आहे !
अनिकेत सांगलीतल्या लकी बॅग हाऊसमध्ये काम करीत होता, त्या शॉपचा मालक वरच्या मजल्यावरअश्लील सीडी तयार करून नंतर ही सीडी विकत होता, त्याची कुणकुण लागताच अनिकेतने काम सोडले !
आपला गोरखधंदा अनिकेत बोभाटा करून बंद पाडेल या भीतीने मालकाने कामटेशी संपर्क साधला !
कामटे आणि या हरामखोर मालकाचे आर्थिक हितसंबंध असल्याने कामटेने अनिकेतला चोरीच्या खोट्या आरोपाखाली अटक केली, दहशत बसवण्यासाठी थर्ड डिग्री वापरली आणि एका निष्पाप तरुणांचा नाहक बळी घेतला !
सांगलीच्या या घटनेमुळे पोलीस खात्यावरील होता – नव्हता विश्वास उडाला आहे.
विशेष म्हणजे कोल्हापूरला विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे – पाटील असताना ही दुर्देवी घटना घडली आहे !
सांगलीतच काही महिन्यापूर्वी दरोड्याच्या गुन्ह्यात काही पोलीस सापडले होते,त्याची शाई वाळते न वाळते तोच पोलिसांचा हा नवा प्रताप समोर आला आहे.
सांगली काय तब्बल महाराष्ट्रात उस्मानाबाद, अमरावती आदी जिल्ह्यात पोलिसांनी आपल्या हिताच्या आड येणाऱ्यास खोट्या गुन्ह्यात गोवले आहे.
त्यांचा छळ करून जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला आहे.
महाराष्ट्रात भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून पोलिसांची मुजोरी वाढली आहे !
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहखाते आहे, त्यांचा गृहखात्यावर कसलाही वचक नाही.
त्यामुळे या खात्याची लक्तरे वेशीवर टांगण्याचे काम भ्रष्ट पोलीस करीत आहेत !
उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग पोलीस स्टेशनच्या एका पोलीस उपनिरीक्षका सह चार पोलिसांना पाच महिन्यापूर्वी दरोड्याच्या प्रकरणात अटक झाली असून ते सध्या जिल्हा कारागृहात जेलची हवा खात आहेत !
मूळ उस्मानाबाद चा आणि सांगलीत ड्युटी करणारा पोलीस उपनिरीक्षक प्रेम बनसोडे बलात्काराच्या आरोपाखाली वर्षभरापूर्वी अटक झाला होता.
त्याला दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा झाली आहे, अशी किती तरी उदाहरणे देता येतील.
राज्यात सांगली , उस्मानाबादसह अनेक जिल्हयात उघड मटका आणि अवैध धंदे सुरु आहेत.
पोलीस खात्यावरील वचक संपला आहे.
त्यामुळे कामटे सारखे भामटे पोलीस खात्यात तयार झाले आहेत !
विश्वास नांगरे – पाटील सारखे मूठभर पोलीस अधिकारी याला अपवाद असले तरी आभाळच फाटलं आहे, त्याला ठिगळ तरी कुठं कुठं लावणार आहेत !