तर सीरममधून लसीची एकही गाडी बाहेर पडू देणार नाही! कोणी दिला असा इशारा आणि कोणाला ?

प्रतिनिधी:-
करोना लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्यातील लसीकरण मोहीम थंडावली आहे.
राज्यातील अनेक लसीकरण केंद्र लसीविना बंद करण्यात आली असून,
मुंबईतही आठवडाभरासाठी केवळ शासकीय लसीकरण केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लसी देण्याच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्यात शाब्दिक चकमक सुरू असून,
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना इशारा दिला आहे.
लस वाटपात केंद्राकडून महाराष्ट्रासोबत दुजाभाव केला जात असल्याचा दावा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केल्यानंतर केंद्र-राज्य यांच्यात वादाची ठिणगी पडली.
लस वाटपावरून राजकारण चांगलंच तापलं आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन, प्रकाश जावडेकर यांच्यासह भा.ज.पा.च्या महाराष्ट्रातील नेत्यांनी राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या आरोपावर टीका केली होती.
हर्ष वर्धन आणि प्रकाश जावडेकर यांनी टीका केल्यानंतर राजेश टोपे यांनी आकडेवारी सांगत वस्तुस्थिती मांडली होती.
‘ लस’कारणावरून केंद्र-राज्य यांच्यात जोरदार खडाजंगी सुरू असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांना पत्र लिहिलं आहे.
एका आठवड्यात महाराष्ट्राच्या लस पुरवठ्यात वाढ करण्यात आली नाही,
तर सीरम इन्स्टिट्यूटमधून इतर राज्यात लस घेऊन जाणारी वाहने बाहेर पडू देणार नाही,
असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.