पुण्यात दोन पिस्तुल आणि काडतुसांसह शिक्षक गजाआड !
प्रतिनिधि.
पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हणून जगात मान्यता मिळालेली आहे.
अशा या पुण्यात मुलांना पाटी पेन्सिल धरायला लावून, शैक्षणिक मार्गदर्शन करणाऱ्या एका शिक्षकाकडे पिस्तुल मिळून आल्याने, शैक्षणिक क्षेत्रावर तरी कितपत विश्वास ठेवायचा असा प्रश्न उपस्थित झाला आहे?
शिक्षक आणि त्याच्या सहकाऱ्याला अटक करण्यात आली असून, वेल्हे पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार किशोर कोरडे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तानाजी धोंडीबा मरगळे (वय.३६), दत्तात्रय खंडू निवंगुणे (वय.३३ दोघेही राहणार ता.वेल्हे, जिल्हा.पुणे) असे पिस्तुल आणि काडतुसांसह अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून,
तानाजी मरगळे हे जिल्हा परिषद शाळा, रुळे, ता.वेल्हे, जिल्हा.पुणे या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्या आदेशावरून पुणे ग्रामीण हद्दीत बेकायदा व्यवसाय, शस्त्र बाळगणाऱ्यांच्या शोध घेत असताना, पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्यानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने, सहायक पोलीस फौजदार दिलीप जाधवर, पोलीस हवालदार किशोर कोरडे, दत्तात्रय जगताप, रौफ इनामदार, राजू चंदनशिव, अनिल जगदाळे, रवी शिनगारे, अजय कोकणी, प्रमोद नवले यांचे पथक पानशेत धरण परिसरात गस्त घालत असताना, सहायक पोलीस फौजदार दिलीप जाधवर यांना खबऱ्यामार्फत एक शिक्षक आणि त्याच्या सहकाऱ्याकडे बेकायदा गावठी पिस्तुल असल्याची माहिती मिळाली.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने, सहायक पोलीस फौजदार दिलीप जाधवर आणि पथकाने पानशेत धरणाजवळील भागात असलेल्या काळभैरवनाथ प्रवेशद्वाराजवळ सापळा रचला असता,
त्या भागात मिळालेल्या वर्णनाचे दोघे संशयित उभे असल्याचे दिसले.
त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्या कमरेला ४० हजार २०० रुपये किमतीची दोन चालू स्थितीतील पिस्तुल आणि जिवंत काडतूसे मिळून आली.
त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यातील तानाजी मरगळे हा जिल्हा परिषद शाळा, रुळे येथे शिक्षक म्हणून कार्यरत असल्याचे ऐकून पोलीस पथकाला देखील धक्का बसला.
दोघांनाही ताब्यात घेऊन, अटक करण्यात आली आहे. तपास वेल्हे पोलीस करत आहेत.