वाझे यांच्या खात्यातून २६ लाखांचा संशयास्पद व्यवहार, कोणी केला?

download (64)

मुंबई :

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्याप्रकरणी अटकेत असलेल्या निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या वर्सोवा येथील बँक खात्यातून १८ मार्चला २६ लाख ५० हजार रुपये काढण्यात आले.
त्याच बँकेतील लॉकरमधून तपासाची संबंधित महत्त्वाची कागदपत्रेही काढून घेण्यात आल्याचा संशय राष्ट्रीय तपास यंत्रणेने व्यक्त केला आहे.
वाझे यांचे एका महिलेबरोबर या बँकेत खाते होते.
१३ मार्चला वाझे यांना अटक केल्यानंतर १८ मार्चला या बँक खात्यातून संशयास्पद व्यवहार झाल्याचा तपास एन.आय.ए.कडून केला जात आहे.

त्याचबरोबर याप्रकरणाशी संबंधित लॅपटॉप, डी.व्ही.आर., सी.पी.यू. आदी साहित्य जप्त केले असून त्याचाही तपास एन.आय.ए.ला करायचा आहे.
त्यामुळे वाझे यांची कोठडीची मागणी एन.आय.ए.कडून करण्यात आली होती.
मे.विशेष न्यायालायाने वाझे यांच्या कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.
मनसूख हिरेन हत्या प्रकरणाचा तपासही एन.आय.ए.कडून सुरू आहे.

मनसूख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत सापडला होता.
हिरेन यांचा मृतदेह सापडलेल्या ठिकाणी वाझे ४ मार्चला फिरताना आढळून आल्याचा दावा एन.आय.ए.ने
मे. न्यायालयात केला.
तसेच एन.आय.ए.ने २ एप्रिलला एक मर्सिडीज कार जप्त केल्याची माहिती मे.न्यायालयात दिली.
दरम्यान वाझे यांच्याबरोबर लॉकर असलेल्या महिलेला एन.आय.ए.ने चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हृदयविकारासंबंधीत आजाराच्या उपचारांची मागणी वाझे यांच्या वकिलांनी मे.न्यायालयाकडे केली होती.
वाझे यांना हृदयविकाराचा आजार असून  अँजिओग्राफी करण्याची गरज आहे, असे त्यांच्या वकीलाने मे.न्यायालयाला सांगितले.
मात्र वाझे यांना योग्य ते उपचार दिले जात आहेत, असे एन.आय.ए.ने सांगितले.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT