अजीत दादा अजून एवढ़े लहान आहेत का दीपक केसर जी?

मुंबई
विशेष प्रतिनिधि

68 वर्षांचे दीपक केसरकर आजोबा म्हणाले की, अजितदादा अजून लहान आहेत! म्हणजे मुख्यमंत्री बनण्यासाठी त्यांना बराच अवधी आहे, असे केसरकर आजोबांना म्हणायचे आहे. आजोबांचे दादांवर खूप प्रेम आहे आणि दादा महाविकास आघाडीत असतानाही, आजोबांच्या प्रेमाचा पान्हा वारंवार फुटत असे.

आज दादांचे वय तर फक्त 64 आहे! आजोबांचे ताजे बॉस एकनाथजी हे 58 व्या वर्षी सीएम झाले. आजोबा दादांना जसा दिलासा देत आहेत, तसाच महाराष्ट्रात खोकेक्रांती घडवणाऱ्या एकनाथजींनाही पूर्वी ते देत होते का, त्याची कल्पना नाही. आजोबांचे अगोदरचे बॉस उद्धवजी हे दादांच्याही अगोदर, बरोबर साठीतच सीएम झाले.

केसरकर आजोबांचे सन्मित्र देवेंद्रजी हे 44 व्या वर्षी सीएम झाले. यशवंतराव चव्हाण 43 व्या वर्षी द्वैभाषिकाचे आणि 47 व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. कन्नमवार सीएम झाले, तेव्हा त्यांचे वय 62 वर्ष होते. वसंतराव नाईक पन्नासाव्या वर्षी सीएम झाले, तर शंकरराव चव्हाण 55 व्या वर्षी. महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री हे शरद पवार असून, ते सीएम झाले, तेव्हा 38 वर्षांचे होते.
तरी देखील केसरकर आजोबा पवार साहेबांच्या पुतण्याला म्हणत आहेत, की ‘धीर धरी, धीर धरी’.

पूर्वी अजितदादांच्या हृदयात काकांचे स्थान अढळ होते. आता काकांपेक्षाही त्यांना यशवंतरावांची आठवण अधिक प्रकर्षाने येऊ लागली आहे. दादाही म्हणे आता यशवंतरावांच्या मार्गाने जाऊ इच्छितात. परंतु यशवंतराव स्वगृही, म्हणजे इंदिरा काँग्रेसमध्ये परतले, तेव्हा त्यांना दुर्दैवाने बरीच प्रतीक्षा करावी लागली होती. उद्या तशीच वेळ आल्यास, दादा स्वगृही, म्हणजे काकांच्या कडे परत येऊ शकतील की नाही, याची कल्पना नाही!

माजी सीएम अब्दुल रहमान अंतुले 51 व्या वर्षी, बाबासाहेब भोसले 61 व्या वर्षी, निलंगेकर व विलासराव 54 व्या वर्षी, सुधाककरराव नाईक 57 व्या वर्षी, मनोहर जोशी 58 व्या वर्षी, सुशीलकुमार शिंदे 62 व्या वर्षी, नारायण राणे 47 व्या वर्षी, अशोक चव्हाण 50 व्या वर्षी, तर दादांचे ‘परममित्र’ पृथ्वीराज चव्हाण 64 व्या वर्षी मुख्यमंत्री झाले.

आता दादा पासष्टीच्या दिशेने प्रवास करू लागले आहेत. जाहिरातीला पासष्टावी कला मानली जाते. दादांनी ही कला लवकरात लवकर अधिक आत्मसात करावी, ( वाटल्यास त्यासाठी देवेंद्रजींचा सल्ला घ्यावा) आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री होऊन विकासाचे सिंचन करावे व प्रगतीचे सहकारी शिखर गाठावे , हीच त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. शिवाय दादा शंभरी गाठेपर्यंत केव्हाही मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी केसरकर आजोबांची देखील इच्छा आहेच. हे कोकणचे आजोबा ( नारायणरावांचे जीवलग मित्र) त्यांना आशीर्वाद देण्याच्या पवित्र्यात सज्जच आहेत. तसे तर जो कोणी सत्तेवर असेल आणि मुख्यमंत्रीपदी असेल, त्याच्यावर आजोबांचा विशेष लोभ असतो, हे दादांनीही लक्षात ठेवावे.-

साभार


हेमंत देसाई

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT