ऊंच स्वरात गायन ,गायक महेंद्र कपूर , यांची आज पुण्य तिथि आहे , अलीकड़े फाल्गुनी पाठक आणि नेहा ककर यांच्यात बरीच जुंपली आहे

मुंबई प्रतिनिधि

खोयाखोयाचाँद बाबूमोशाय

महेंद्र कपूरचा आवाज खुला आणि सहजपणे वरच्या पट्टीत जाणारा, टिपिकल पंजाबी. उदाहरणार्थ ‘न मुँह छुपा के जिओ’ हे गाणे ऐका. अलीकडे फाल्गुनी पाठक आणि नेहा कक्कर यांच्यात चांगलीच जुंपली आहे. हल्लीच्या गायक- गायिकांमध्ये भयानक स्पर्धा व असूया दिसून येते. पूर्वीच्या काळात हे अजिबातच नव्हते, असे मला बिलकुल म्हणायचे नाही, परंतु हे कमी प्रमाणात होते.

महेंद्र कपूरचा आदर्श म्हणजे मोहम्मद रफी. तू शास्त्रोक्त संगीत शिक, असा सल्ला रफीने महेंद्रला दिला होता. महेंद्र अमृतसरहूनन मुंबईला आला आणि रफीला भेटला. त्यांच्यात गुरुशिष्याचे नाते निर्माण झाले. तो अनेकदा रफीच्या रेकॉर्डिंग्जला हजर असे. त्यावेळी रेडिओवर ऑल इंडिया मेट्रो मर्फी गानस्पर्धा होत असे. ही स्पर्धा जर तू जिंकलास, तर मी तुला कोलकत्याला माझ्या शो ला घेऊन जाईन, असे आश्वासन रफीने महिंद्रला दिले होते.

1958 सालची ही स्पर्धा महेंद्र जिंकला आणि तो रफीबरोबर कोलकत्याला जाऊ शकला. या स्पर्धेचे परीक्षक होते सी रामचंद्र, नौशाद, वसंत देसाई, मदन मोहन आणि अनिल विश्वास. विजेत्याला या संगीतकारांबरोबर काम करण्याची संधी मिळणार होती. मग सी रामचंद्र यांनी महेंद्रला आशा भोसलेबरोबर ‘नवरंग’ चित्रपटात ‘आधा है चंद्रमा’ हे गाण्याची संधी दिली. त्या संधीचे त्याने सोने केले .नौशादने ‘हुस्न चला है इश्क से मिलने’ हे ‘सोनी महिवाल’ मधील गाणे दिले.

त्यानंतर तेरे प्यार का आसरा चाहता हूँ, आज की मुलाकात बस इतनी ही अनुक्रमे ‘धूल का फूल’ आणि ‘भरोसा मधील महेंद्रची गाणी गाजली. 1964 मध्ये ‘चलो एक बार फिर से’ या गाण्याबद्दल महेंद्रला फिल्मफेअर मिळाले. तेव्हा रफीच्या ‘मेरे मेहबूब’ मधील गाणी गाजत होती. परंतु गुरुवर मात करून शिष्याने फिल्मफेअर मिळवले. महेंद्र कपूर म्हणजे फक्त मनोजकुमारची देशभक्तीची गाणी, असा अनेकांचा गैरसमज आहे. त्याच्या पलीकडेही त्याचे मोठे अस्तित्व होते. किशोरकुमारबरोबर महेंद्रने दो बेचारे बिना सहारे, वक्त की हेराफेरी है, जिंदगी है क्या, बोलो जिंदगी है क्या?, अनहोनी को होनी कर दे वगैरे अनेक गाणी अत्यंत जोशपूर्ण व धमाल रंगात म्हटली. एकदा महेंद्रने राज कपूरबरोबर परदेशात शो केला आणि येताना राज कपूरने त्याला संधी देण्याचे कबूल केले. ‘संगम’ मधील ‘हर दिल जो प्यार करेगा’ मध्ये मुकेशप्रमाणे त्याचाही आवाज वापरण्यात आला आहे. ‘अपनी अपनी सबने कह दी, लेकिन हम चुपचाप रहे’ या ओळी त्याने गायल्या आणि त्या राजेंद्रकुमारच्या ओठी आहेत.

नय्यर आणि रफीमध्ये 1960 च्या दशकात मतभेद निर्माण झाले, त्याचा सर्वाधिक फायदा महेंद्रला मिळाला! मग बदल जाये अगर माली, मेरा प्यार वो है की, अंधेरे में जो बैठे है, लाखों है यहाँ दिलवाले अशी अनेक गाणी महेंद्रने म्हटली. ‘दादीमाँ’मधील (त्यात आपला काशिनाथ घाणेकर आहे) मन्ना डेबरोबर त्याने म्हटलेले ‘उसको नहीं देखा हमने कभी’ हे गाणे माझ्या लहानपणी ओठाओठांवर होते. रफीबरोबर ‘आदमी’ या चित्रपटात ‘कितनी हसीन आज बहारों की रात है’ हे गाणे गाण्याची संधी महेंद्रला मिळाली. ते अगोदर तलत म्हणणार होता, परंतु मनोजला त्याचा आवाज फिट्ट बसला नसता, म्हणून महेंद्रला ही संधी मिळाली. ते गाणे गाण्यापूर्वी महेंद्रने तलतकडे जाऊन ‘मी हे गाणे गायले,तर चालेल का?’ अशी त्याची रितसर परवानगी मागितली होती..सदैव नम्र रहा, कोणाशी भांडू नकोस आणि हे सर्व जे दिले आहे, ते परमेश्वराने दिले आहे, अशी भावना सतत मनात जागी ठेव, असे रफीने महेंद्र कपूरला सांगितले होते.

रवी, ओपी आणि कल्याणजी आनंदजी या तिघांनी महेंद्रला खूप संधी दिली. महेंद्रने ‘गोपी’ या चित्रपटात म्हटलेले ‘हे रामचंद्र कहे गये सिया से’ हे भजन पारंपरिक, पण त्यात खास महेंद्र कपुरी ढंग आहे. रफीप्रमाणेच डोंगरदर्‍यात घुमणारा असा पहाडी आवाज महेंद्र कपूरला मिळाला होता. मराठीत तो दादा कोंडकेचा आवाज होता आणि रमेश देवचाही. त्याचा मुलगा रोहन हा गायक नट असून, नायक व गायक म्हणून तो अपयशी ठरला. परंतु त्याचा नातू म्हणजे रोहनचा मुलगा सिद्धांतने काही दिवसांपूर्वीच लंडनमध्ये ‘बर्थ ऑफ गणेशा’ हा संस्कृत-हिंदीमधील ऑपेरा सादर केला.

त्यामधील बहुतेक कलावंत विदेशी होते. या ऑपेराचे प्रचंड कौतुक झाले. आज आपल्या नातवाचे कौतुक बघायला महेंद्र कपूर हवा होता… साहिरच्या गीतांना आपल्या आवाजातून खोली आणि वेगवेगळ्या मिती प्राप्त करून देणारा महेंद्र कपूर. आज पुण्यतिथीनिमित्त त्याला आदरांजली.-

साभार
हेमंत देसाई

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT