पुणे व पुणेकर वर बिंनडोक ताशेरे झाड़ने आड़ानी व्यक्तिना या वृत्ता ची माहिती देने बद्दल विनांति
पुणे व पुणेकरांवर बिनडोक ताशेरे झाडणार्या अडाणी माणसांना ही पोस्ट त्वरीत फॉर्वर्ड करा:
चोहीकडून सह्याद्रीच्या रांगांनी वेढलेले पुणे हे शहर एकेकाळी अक्षरशः थंड हवेचे ठिकाण होते. येथील हवा अत्यंत शुद्ध होती. पाणी अतिशय गोड व मुबलक होते. देवस्थाने, निसर्गरम्य ठिकाणे, महाराजांचा पदस्पर्श झालेले किल्ले, नावाजलेल्या शैक्षणिक व इतर संस्था, संशोधन संस्था, लष्करी संस्था आणि संतांनी पावन केलेल्या वास्तू सहजगत्या जाण्यासारख्या व रम्य होत्या.
हे शहर इतके सुरक्षित ठिकाण होते की एखादी तरुण मुलगी पहाटे तीन वाजताही एकटी कुठेही जाऊ शकायची. महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील एक अतिशय समृद्ध शहर म्हणून पुणे नक्कीच जुन्या पुणेकरांना आठवत असेल. येथील दुकाने दुपारी बंद असायची ह्याचे कारण पुणेकरांना मिळत असलेली शांत व सुखद जीवनशैली हे होते.
दुपारी दुकानांची सहसा गरजच भासायची नाही. चितळ्यांवर केले जाणारे फालतू विनोद वाचताना ह्या चितळ्यांमुळे हजारोजणांना रोजगार मिळाला आणि दर्जेदार खाद्यपदार्थ मिळत राहिले हे विसरून चालणार नाही. पु ल देशपांडेंनी कधीतरी एका लेखात पुणेकरांवर ओढलेले ताशेरे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ नव्हे. पु ल हे वंदनीय व महान असले तरी त्यांनी केलेले पुण्याचे व पुणेकरांचे वर्णन म्हणजे एखादा सरकारी दस्तऐवज नव्हे. किंबहुना, इतर अनेक शहरांमध्ये पिण्याचे पाणी, मोठाल्ली अंतरे, प्रदुषण, तणाव, विपरीत हवामान अशी अवस्था असल्यामुळे तेथील माणसांमध्ये आपोआपच फोफावणारी स्वार्थी व असंवेदनशील प्रवृत्ती पुणेकरांमध्ये कधीच नव्हती.
खत्रूड, खडूस ही विशेषणे पेठांमधील माणसांना लावण्यापूर्वी त्या खत्रूड लोकांना आपण ज्या शंका विचारायचो त्या किमान डोके वापरून तरी विचारायचो का हे संबंधितांनी मनाशी तपासून पाहावे. ‘जोगळेकर कुठे राहतात’ ह्या प्रश्नावर ‘कोणते जोगळेकर’ हा प्रतीप्रश्न पुण्यात विचारला जाणे अगदी नैसर्गीक आहे कारण अनेक जोगळेकर एका परिसरात असू शकायचे.
शिक्षणाचे माहेरघर म्हणून लौकीक असलेल्या पुण्यात नंतर शिक्षण हा तिरस्करणीय बाजार झाला. दूरदूरहून शिकायला विद्यार्थी येथे येऊ लागले. वसतीगृहांपासून ते टपर्या, उपाहारगृहे आणि परमिट रूम्सचा सुळसुळाट झाला. मुले उभी असलेल्या रस्त्यावरून खाली मान घालून शांतपणे निघून जाणार्या पुणेकर मुलींची जागा बाहेरून आलेल्या आणि मुलांबरोबर सिगारेटी फुंकत उभ्या राहणार्या मुलींनी घेतली.
शिक्षणापाठोपाठ ऑटोमोबाईल्स सेक्टरने पुण्यात पाय रोवले. प्रदुषणाच्या पातळ्या वाढू लागल्या. नोकरीसाठी भारतभरातून लोंढे येऊ लागले. अॅन्सिलरी युनिट्समध्ये काम करण्यासाठी लाखो कामगार पुण्यात धावू लागले. पुण्याची सुबत्ता गिळंकृत होऊ लागली. वारेमाप वृक्षतोड झाली. टेकड्या ओक्याबोक्या झाल्या. पाणीकपात सुरू झाली. विजेचा खेळखंडोबा सुरू झाला. पाऊस कमी झाला. उपनगरे, उपनगरांची उपनगरे वसू लागली. धूळ, धूर, प्रदुषण, ऊन आणि तणाव वाढू लागला.
शिक्षण आणि ऑटोमोबाईलपाठोपाठ पुण्याची एकंदर सुबत्ता आणि स्ट्रॅटेजिक लोकेशन ध्यानात घेऊन आय टी सेक्टरनेही येथेच पाय रोवले. ह्या क्षेत्राने नुसतेच लाखांनी परप्रांतीय पुण्यात घुसवले नाहीत तर पुण्याची म्हणून जी एक खणखणीत संस्कृती होती तिचे धिंडवडेही काढले. किंमती अवाच्या सवा वाढल्या. अंतरे भली मोठी झाली. बार, ढाबे, मसाज पार्लर्स, पब्ज आणि रेव्ह पार्टीज हे सगळे काही जणू येथील संस्कृतीचा एक भाग बनले.
पुणे आजही ह्या सगळ्यांना पुरून उरत आहे. पाणी देत आहे, वीज देत आहे, जागा देत आहे, घरे देत आहे, रस्ते देत आहे. पण आता बास झाले. आज मूळ पुणेकर केवळ पस्तीस टक्के उरलेले आहेत. पासष्ट टक्के लोक हे पुण्याबाहेरचे असूनही पुण्यावरील विनोदांवर हलकटपणाने हसत आहेत. इथेच खात आहेत आणि इथेच घाण करत आहेत आणि ह्याच शहराची थट्टाही करत आहेत. वाईट ठरत आहेत ते मात्र फक्त पुणेकर आणि एकेकाळचे श्रीमंत, समृद्ध पुणे!

पुणे आता पूर्वीसारखे तर कधीच होणार नाही, पण पुण्याचा र्हासही आता थांबवणे शक्य नाही. कोणालाही शक्य नाही. ना राजकारण्यांना, ना उद्योजकांना! काहीही नियोजन न करता केलेली बांधकामे, संसाधनांचा वाटेल तसा होत असलेला वापर, निसर्गावर सातत्याने होणारी कुरघोडी ह्यामुळे पुणे लवकरच स्मार्ट सिटी ऐवजी डर्ट सिटी होण्याची शक्यता आहे. बकाल पुणे बघण्याची संधी नजीकच्या भविष्यात मिळणार आहे. परप्रांतियांचा भारतात कुठेही जाऊन राहण्याचा हक्क आहेच. तो नाकारण्याचा अधिकार कोणालाही नाही. पण निदान दिड दमडीच्या विनोदांवर हसून स्वतःच्या अकलेचे हसू करून घेऊ नका. तुम्ही अश्या शहराला हसत आहात जे तुमच्या शहरापेक्षा शेकडोपटींनी आजही चांगले आहे.
एक शुद्ध आणि व्यथित पुणेकर!