बीस वर्ष वयात संगीत क्षेत्रात आज केले पदार्पण आज 12 सितंबर चा त्यांचा जीवनातील अखेर चा दिवस, संगीतकार जय किशन डाहीया भाई पांचाल,जाने कहां गए वो दिन !
बरोबर बावन्न वर्षांपूर्वी, 12 सप्टेंबरला संगीतकार जयकिशन डाह्याभाई पांचाल याचे निधन झाले, तेव्हा तो फक्त 41 वर्षांचा होता. याचा अर्थ, विशीच्या अगोदरच त्याने संगीत क्षेत्रात धूम मचवण्यास सुरुवात केली होती! कारण ‘बरसात’ 1949 सालचा. तेव्हा जयकिशन जेमतेम 20 वर्षांचा होता.
शंकर-जयकिशनने अत्यंत थोर काम करून ठेवले आहे, हे सर्वांना माहितीच आहेच. परंतु हे दोघे संगीतकार वेगळे झाले, त्यामागे एक कारण होते शारदाचे. शारदाला गायिका म्हणून शंकरने नको तेवढा स्कोप दिला आणि ‘लता असताना शारदा कशाला?’ असा जयकिशनला पडलेला रास्त प्रश्न होता. वास्तविक स्वराकाशात समजा लता नसती, तरीदेखील तिथे शारदा नावाची चांदणी कशाला उगवली आहे? असा अनेकांना प्रश्न पडला असता, तो भाग वेगळा.
जयकिशनचा अत्यंत जवळचा दोस्त होता शम्मी कपूर. शंकरपासून विभक्त झाल्याचे त्याला तीव्र दुःख झाले होते. त्यामुळे जयकिशन खूप प्यायला लागला होता, असे शम्मी कपूरनेच एकदा सांगितले होते. शंकर-जयकिशनच्या अनेक गाण्यांचे मुखडे घेऊन पुढे चित्रपट बनले. उदाहरणार्थ राजा की आयेगी बारात, तुमसे अच्छा कौन है, कश्मीर की कली, आ गले लग जा, आन मिलो सजना, तुमको ना भूल पायेंगे, कुछ कुछ होता है, नैंन मिले चैन कहाँ, आ जा सनम, आ अब लौट चले, फिर भी दिल है हिंदुस्तानी, मैं आशिक हूँ बहारों का, मुझे मेरी बिवी से बचाओ, कौन है जो सपनों में आया, बोल राधा बोल, बुड्ढा मिल गया, दिल के झरोकों से, गुस्ताखी माफ, लाल दुपट्टा मलमल का वगैरे.
गमतीची गोष्ट म्हणजे, लता आणि जय एकाच वर्षी, म्हणजे 1929 मध्ये जन्मले. मदनमोहन, देवेन वर्मा आणि सतीश वागळे हे जयकिशनचे दोस्त. हे सर्वजण चर्चगेटजवळच्या गेलाॅर्ड या हॉटेलमध्ये जमायचे. आजही हे हॉटेल असून, ते अत्यंत चविष्ट आहे. सतीश वागळेचे ‘प्यार ही प्यार’ आणि ‘यार मेरा’ हे चित्रपट प्रसिद्ध आहेत. ‘प्यार ही प्यार’ मध्ये ‘मैं कहीं कवी ना बन जाऊँ’ हे मोहम्मद रफीचे सुरेख गाणे आहे. शंकर-जयकिशनने संगीतबद्ध केलेल्या ‘रूप की रानी चोरों का राजा’ या चित्रपटात एसजेने देवसाठी तलत व महेंद्र कपूरचाही आवाज वापरला! ‘अंदाज ‘मध्ये एसजेने सुषमा श्रेष्ठला प्रथम संधी दिली. ‘बॉबी’ आणि ‘सीता और गीता’साठी प्रथम एसजेला करारबद्ध करण्यात आले होते. तशा वर्तमानपत्रांमधून जाहिरातीही प्रसिद्ध झाल्याचे आठवते.
गुरुदत्तने एसजेचे संगीत असलेल्या ‘साँज और सवेरा’ या बहुधा एकाच चित्रपटात काम केल्याचे स्मरते. मात्र त्याचा भाऊ आत्माराम ने शिकार, चंदा और बिजली, उमंग, यार मेरा साठी या जोडीलाच घेतले होते. दत्ताराम, सेबॅस्टियन हे एसजेचे प्रमुख सहाय्यक. दत्ताराम संगीतकार म्हणून देखील प्रसिद्ध झाले. साॅनी कॅस्टेलिनो हा ‘आवारा’मध्ये, धीरज हा ‘संन्यासी’ मध्ये तसेच इनाॅक डॅनियल्स हे त्यांचे सहाय्यक होते. 1967 मध्ये ‘एव्हरेस्ट’ या डॉक्युमेंटरीसाठी एसजेने संगीत दिले होते.
शत्रुघ्न सिन्हाने ‘मेरा जूता है जपानी’ हे एसजेचे गाणे एका सोहळ्यात म्हटले होते. तर 1956मध्ये सुधा मल्होत्राने मन्ना डेबरोबर ‘चोरी चोरी’ मधील दोन गीते म्हटली होती, तो समारंभ होता ‘फिल्मफेअर’चा. जयकिशन हा उत्कृष्ट हार्मोनियम वादक होता. यथायोग्य पार्श्वसंगीत देण्यातही तो तरबेज होता. ‘गुमनाम’ आठवा. ‘बरसात’ला संगीत देण्यासाठी राजकपूर हा संगीतकारांच्या शोधात होता, त्यावेळी शंकर-जयकिशन त्याला ॲप्रोच झाले. प्रथम चाल बांधून मग त्यावर गाणे असावे, असा जयकिशनचा आग्रह असे.
शंकर-जयकिशन म्हणून जोडीचे 121 चित्रपट आहेत. जयकिशनचे निधन झाल्यानंतर शंकरने सुमारे तीस चित्रपट स्वतंत्रपणे केले. ‘बॉम्बे टॉकीज’ या इंग्रजी चित्रपटासाठी एसजेने संगीत दिले. 1965 च्या आसपास शंकर-जयकिशन यांची लोकप्रियता एवढी प्रचंड होती की, त्यावेळी त्यांना सर्वाधिक, म्हणजे पाच लाख रुपये मानधन मिळत होते. त्या काळाच्या मानाने खूपच चांगले मानधन होते. ‘मैं सुंदर हूँ’ या चित्रपटात जयकिशन आनंद बक्षीबरोबर पडद्यावर दिसतो. अकॉर्डियनवर भर आणि भैरवीच्या सुरावटींचा सढळ वापर, हे जयकिशनचे वैशिष्ट्य. बसंतबहार, सीमा, मेरे हुजूर, लव्ह इन टोकियो, जाने अंजाने, साँज और सवेरा, बेटी बेटे, लाल पत्थर, चोरी चोरी, मेरा नाम जोकर यामध्ये शास्त्रोक्त आधारावरील गाणी अतिशय उत्कृष्ट असून, त्यांच्या रचनांत जयकिशनचाही मोठा हिस्सा होता.
शम्मी कपूर, राजेंद्रकुमार, देव, मनोजकुमार यांच्या यशात शंकर-जयकिशन यांचा सिंहाचा वाटा म्हणावा लागेल. जयकिशन दिसायलाही देखणा होता. पुण्यात सेनापती बापट रस्त्यावर एका गल्लीचे नाव ‘शंकर-जयकिशन मार्ग’ असे आहे. जयकिशनची आठवण येताच ‘जाने कहाँ गये वो दिन’ अशी भावना होते आणि मन बरीच वर्षे मागे जाते..
संवाद साभार
-हेमंत देसाई