सचिन वाझेचा साथीदार पोलीस अधिकारी रियाझ काझीला का करण्यात आली अटक?

प्रतिनिधी:-
अँटिलिया स्फोटकं प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असताना आता सचिन वाझेचा साथीदार असलेल्या पोलीस अधिकारी रियाझ काझी याला एन.आय.ए.ने अटक केली आहे.
स्फोटकं ठेवण्याच्या कटात त्याचा सहभाग असल्याचं स्पष्ट झाल्याने ही अटक करण्यात आली आहे.
पुरावे नष्ट करण्यासाठी सचिन वाझेला मदत केल्याचं एन.आय.ए.च्या चौकशीत समोर आलं आहे.
एन.आय.ए.नं यापूर्वीही पोलीस अधिकारी रियाझ काझीला चौकशीसाठी बोलवलं होतं.
मात्र त्यावेळेस त्याने एन.आय.ए.च्या प्रश्नांना उत्तरं देण्यास टाळाटाळ केली होती.
पुन्हा एकदा चौकशीला बोलवल्यानंतर एन.आय.ए.ने काझीला अटक केली आहे.
गेल्याच महिन्यात रियाझ काझीला पोलीस दलातून निलंबित करण्यात आलं आहे.
अँटिलियाबाहेरील स्फोटकं प्रकरण अंगाशी येतंय हे पाहून रियाझ काझी विक्रोळीत गाड्यांचे नंबर प्लेट बनवण्याऱ्या दुकानात गेला.
काझी दुकानात जाताना सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यात चित्रित झाला होता,
हे मात्र त्याच्या लक्षात आलं नाही.
त्याला फक्त दुकानातील सी.सी.टी.व्ही. आणि फुटेज ताब्यात हवं होतं.
दुकानात गेल्यानंतर त्याने मालकाशी संवाद साधला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी दुकानातील डिजिटल व्हि.डि.ओ. रेकॉर्डर आणि संगणक सोबत घेऊन गेला.
त्याचबरोबर वाझेच्या शेजाऱ्याकडील सी.सी.टी.व्ही. फुटेजही घेऊन गेला होता.
अँटिलिया स्फोटकं प्रकरणी एनआयएने सचिन वाझेला १३ मार्चला अटक केली आहे.
आता त्याला मदत केल्याप्रकरणी रियाझ काझीला अटक केली आहे.
काझीला मे.कोर्टात हजर केलं असता १६ एप्रिलपर्यंत एन.आय.ए. कोठडी सुनावण्यात आली आहे.