युद्ध ,महा युद्ध आणि एटमी युद्ध म्हणजे काय असत? ते या सरवाना विचारा?

एडमिन

भिंत पाडून एक झालेल्या
जर्मनीला विचारा,
लाल चौकापर्यंत पोहचूनही
थंडीनं गारठून मेलेल्या
नाझींच्या पोरांना विचारा.

पोलंडला विचारा, इटलीला विचारा
ताकद असूनही माघार घेणाऱ्या फ्रान्सला विचारा
झालंच तर (शेवटी) जिकलेल्या ब्रिटिशांना विचारा…
युद्ध काय असतं ?

एका रात्रीत बेचिराख झालेल्या
अन् राखेत सापडलेला
बुद्ध घेऊन उभ्या राहिलेल्या
जपानला विचारा…
रुजायची वाट पाहणाऱ्या
हिरोशिमाच्या मातीला विचारा
निर्वंश झालेल्या नागासाकीला विचारा
युद्ध काय असतं?

आठ वर्षे झुजणाऱ्या
इराणला विचारा, इराकला विचारा
अफगाणिस्तानला विचारा.
व्हिएतनामलाही विचारा
काश्मीरला विचारू नका हवं तर
पण कारगीलला विचारा, लडाखलाही विचारा
युद्ध काय असतं?

भळभळतं कपाळ घेऊन फिरणाऱ्या
अश्वत्थाम्याला विचारा
शंभर पोरांचं कलेवर कवटाळून
रडणाऱ्या गांधारीला विचाराच
पण जिंकलेल्या पांडवांच्या पांचालीलाही विचारा…
युद्ध काय असतं?

पुरूला विचारा, नेपोलिअनला विचारा,
जग जिंकायला निघालेल्या सिकंदराला विचारा
कलिंगचा संहार करणाऱ्या
अशोकाला विचारा

नाहीच जमलं काही तर
युद्ध नाकारणाऱ्या
सिद्धार्थ गौतमाला विचारा…
युद्ध काय असतं?

महिनोंमहिने न भेटणाऱ्या सैनिकांच्या
आई-बापांना विचारा
फोन वाजल्यावर दचकणाऱ्या
बायका-पोरांना विचारा।

देशाच्या सीमेवरल्या गावांना विचारा,
तोफगोळ्यांनी पडलेल्या तिथल्या भिंतींना विचारा
भयकंपाने खचलेल्या घराघराला विचारा
घराघरात अब्रू झाकत लपलेल्या पोरीबाळींना विचारा
युद्ध काय असतं?
सद्धया सुरु आहे यूक्रेन आणि राशियां ला विचारा युद्ध काय आणि कसे आहेत त्याचे परिणाम?

पिणं खाणं उरकल्यावर, शतपावली केल्यावर,
चारचौघांसोबत चौकात अन्
एकटं असताना मोबाईलमध्ये पिंका टाकून झाल्यावर,
टीव्हीवरच्या वांझोट्या चर्चा संपल्यावर
थोडी उद्याची चिंता मिटल्यासारखं वाटल्यावर
जमलंच तर स्वतःलाही विचारा…
युद्ध काय असतं?.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT