30वर्षा पूर्वी 4 जानेवारी रोजी राहुल देव बर्मन अंत्य यात्रा बाघितली होती

मुंबई
विशेष प्रतिनिधि

बरोबर 30 वर्षांपूर्वी जुहू -अंधेरी भागातून बसने घरी परतत असताना, आजच्या म्हणजे 4 जानेवारी या दिवशी राहुल देव बर्मनची अंत्ययात्रा बघितली होती. खूप खूप वेदना झाल्या होत्या. ‘बहारें फिर भी आयेगी’ या गुरुदत्तच्या चित्रपटाचे संगीत अगोदर सचिन देव देणार होते, पण त्यावेळी ते आजारी पडले. खरे तर तेव्हा त्यांच्या मदतीला राहुल किंवा पंचम होताच, पण गुरुदत्तने देखील तो सिनेमा त्यांच्याकडून काढून ओपीकडे दिला.

दुर्दैवाने हा सिनेमा येईस्तोवर गुरुदत्त दूर निघून गेला होता.’आराधना’चे संगीत सचिनदांचे होते, मात्र सहाय्यक म्हणून ‘कोरा कागज था’ वगैरे गाणी पंचमने केली. आपण चांगले गायक नाही हे पंचमने ओळखले होते. त्यामुळे फक्त विशिष्ट पद्धतीने गाऊनच आपण आपली ओळख निर्माण करू शकतो, हे त्याने दाखवून दिले.

उदाहरणार्थ मेहबूबा मेहबूबा, समंदर में नहाके, दुनिया में लोगों को किंवा ‘हम किसीसे कम नहीं” मधील ‘तुम क्या जानो’ वगैरे. मेहबूबासाठी त्याने बियरच्या बाटल्यांचा उपयोग करून विशिष्ट र्‍हिदम आणला. ‘चुरा लिया’ या गाण्यासाठी चहाच्या कप आणि बशांचा वापर केला. देवानंदचा ‘डार्लिंग डार्लिंग’ हा चित्रपट कोणालाही कधीही आठवणार नाही, परंतु त्यातील ‘रात गयी बात गयी’ या गाण्यात पंचमने मजा आणली होती.

त्यासाठी विशिष्ट तर्‍हेचा स्वर आणण्याकरिता पंचमने आपला सहाय्यक मारुती राव याची पाठ चक्क थोपटली होती! त्यामुळे येणारा आवाज त्याला भावला होता. संजीवकुमारच्या ‘चरित्रहीन’ या चित्रपटासाठी पंचमने नगार्‍याचा वापर करून खटखटण्याचा आवाज काढला ‘मंझिल मंझिल’ या चित्रपटात ‘ये नैंना याद है’ या गाण्यात आशा भोसलेचे ‘हा हा हा’ असे हसणे हेच एक र्‍हिदम बनले आहे… त्यात वापरलेली हार्मोनिका ट्यून ही ‘वन्स अपॉन अ टाइम इन द वेस्ट’ या चित्रपटावरून प्रेरित होऊन घेतलेली आहे. ‘सत्ते पे सत्ता’ या चित्रपटात अरनेट पिंटो या गायकाला पंचमने गुळण्या करायला लावल्या.

त्याचा आवाज पार्श्वसंगीतात ऐकू येतो. सेमिक्लासिकल हिंदुस्तानी संगीत आणि गिटार यांचा संयोग करणारा तो कदाचित पहिलाच संगीतकार असेल.’ रैना बीती जाए’ मध्ये संतूर आणि गिटारचा पंचमने संमिश्र वापर केला आहे. तबल्याचा वापर सामान्यतः र्‍हिदमसाठी केला जातो, पण पंचमने तो मेलडी आणि र्‍हिदम दोन्हींसाठी केला. उदाहरणार्थ ओ माँझी रे किंवा तेरे बिना जिया जाये ना.

हिंदी सिनेमात इलेक्ट्रॉनिक ऑर्गनचा त्याने प्रथम वापर केला. अवघ्या नऊ वर्षाचा असताना पंचमने सिनेमासाठी पहिले गीत कंपोझ केले. तो सिनेमा म्हणजे ‘फंटूश’. ‘ए मेरी टोपी पलटके आ’हे ते गाणं. ‘प्यासा’ मधील ‘सर जो तेरा टकराये’ हे आरडीने बांधले आहे. उस्ताद अली अकबर खान आणि सामताप्रसाद हे अनुक्रमे सरोदवादक आणि तबलावादक म्हणून जगप्रसिद्ध. त्यांच्याकडून आरडीने संगीताचे पहिले धडे गिरवले. ‘है अपना दिल तो आवारा’ मधला माउथ ऑर्गन आरडीने वाजवला. ‘ओ मेरे सोना’ मधला इलेक्ट्रॉनिक ऑर्गन बघा काय मस्त आहे! त्याने सिनेमात इलेक्ट्रॉनिक रॉक लोकप्रिय केला.

‘चुरा लिया’ या गाण्यात त्याने ग्लासवर चमचा वाजवून एक वेगळाच आवाज निर्माण केला. ‘चिंगारी कोई भडके’ हे गाणे जन्माला येण्यापूर्वीची गोष्ट. गाणे तयार होता होत नव्हते. तेव्हा भानु गुप्ता गिटारच्या तारांवर काहीतरी वाजवत बसला होता. वेगवेगळ्या सुरावटींचे तेे मिश्रण ऐकून पंचम धावतच तिथे आला आणि त्याला हे गाणे सुचले. हे गाणे सुरू होताना जो ओपनिंग तुकडा आहे, तोच त्याने भानुच्या गिटारमधून ऐकला होता आणि ते ऐकून त्याने पुढचे गाणे बांधले.

‘एक लडकी को देखा’ वगैरे ‘नाईंटीन फोर्टी टू अ लव्ह स्टोरी’ मधील गाणी पाचसहा मिनिटात त्याने बांधली आहेत. पंचमचा मित्र बादल भट्टाचार्य सांगत असे की, पंचम काही महिनेच्या महिने रेकाॅर्डिंग स्टुडिओ बुक करून ठेवे आणि दिवसाला वीस वीस तास संगीतावर काम करत असे. कदाचित पंचम जेव्हा केव्हा तरी झोपत असेल, तेव्हा त्याला सांगीतिक स्वप्नेच पडत असतील, असे एकदा शम्मी कपूरची भेट झाली असताना, त्याने सांगितल्याचे आठवते.

जॅझ, लॅटिनो, फोक, क्लासिकल, रॉक, पाॅप अशा सर्व प्रकारांत त्याला गती होती. सात वर्षे संघर्ष केल्यानंतर पंचमला प्रथम यश मिळाले. केरसी लॉर्डने पंचमचे वर्णन ‘म्युझिकल सायंटिस्ट’ या शब्दात केले होते. अन्य देशांतील संगीत घेऊन ते भारताच्या मुशीतील आहे असे वाटावे असा चमत्कार पंचम करायचा, असे लेस्ली लुइसने म्हटले होते. रोणू मुजुमदारने त्याच्या रचना एखाद्या पेंटिंगसारख्या असतात, असे म्हटले होते. आशा भोसले तर पंचमला ‘मोझार्ट’ असेच संबोधत असे! पंचमला ओळखणारे लोक त्याच्या उमद्या व दिलदार स्वभावाबद्दल भरभरून बोलत असतात.

इतर संगीतकारांबद्दलही पंचम चांगले बोलायचा, हे विशेष! कविता कृष्णमूर्तीसारख्या गायिकेला सुरुवातीच्या काळात त्याने खूप सहकार्य केले होते. पंचम पाककलानिपुण होता आणि लोकांना खिलवण्यात त्याला आनंद वाटायचा. तो आज हयात असता, तर चांगल्यापैकी 85 वर्षांचा म्हातारा म्हणून समोर उभा असता! पण पंचमला कोणी ‘म्हातारा’ म्हणू शकेल का? त्याच्या संगीताला कोणीही ‘जुनाट’ असे’ म्हणू शकेल का? पंचम पंचत्वात विलीन झाला अशी मागे बातमी आली होती एवढेच. तो आपल्या भोवतीच आहे आणि तो तसाच आपल्या मनात भिरभिरत राहणार आहे. पंचम तुझे सलाम!-

साभार;

हेमंत देसाई

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT