निर्बंधांचे पालन न झाल्यास पोलिसांवर च शिस्तभंगाची कारवाई ?

मुंबई : करोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी शासनाने लागू केलेल्या निर्बंधांच्या अंमलबजावणीत दुर्लक्ष किंवा गैरप्रकार आढळल्यास संबंधित अधिकारी, अंमलदारांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे आदेश पोलीस आयुक्तालायाने दिले आहेत.
त्या पार्श्वभूमीवर निर्बंध झुगारणारे नागरिक, व्यावसायिकांवर कारवाई सुरू झाली आहे.
करोना रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर नागरिकांनी मास्क (मुखपट्टी), अंतरनियमाचे पालन थांबविल्याचे दिसून येत होते.
दुकाने, हॉटेल, बार आधी वेळ मर्यादेनंतरही सुरू ठेवण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत.
याविरोधात नागरिकांनी, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तालयाकडे तक्रारी केल्या आहेत.
पोलीस लाच स्वीकारून वेळमर्यादेपलीकडे व्यवसाय सुरू ठेवण्याची मुभा देत असल्याचे आरोपही करण्यात आले.
हे लक्षात घेता सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी निर्बंधांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे आदेश दिले.
५ एप्रिलपासून १० जुलैपर्यंत निर्बंध झुगारणाऱ्यांविरोधात पोलिसांनी २६ हजार गुन्हे नोंदवले आहेत.
यात मास्क(मुखपट्टी) न लावणे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी, विनाकारण फिरणाऱ्यांविरोधात सर्वाधिक गुन्हे नोंद आहेत.