ज्यांचा आवाज अतिशय प्रभावी आहे त्यात सुनील दत्त चा समावेश आहे

मुंबई
प्रतिनिधि

जगाला शांततेचा संदेश देण्यासाठी आणि सर्व जगाने नि:शस्त्रीकरण करावे, अण्वस्त्रे नष्ट करावीत हा संदेश देण्यासाठी 1988 साली तो हिरोशिमा ते नागासाकी असा चालत गेला. पंजाब दहशतमुक्त व्हावा यासाठी त्याने पदयात्रा काढली.

हिंदू -मुस्लिम एकतेसाठी प्रयत्न केले. कॅन्सरपीडित लोकांसाठी प्रचंड काम केले. गोरगरीब झोपडवासीयांना मदत केली. या माणसाचे नाव सुनील दत्त. हिंदी चित्रपटसृष्टीत दिखाऊ समाजकार्य करणारे पुष्कळ असले, तरी सुनील हा सच्चा समाजकार्यकर्ता होता. त्याला मनापासून देशासाठी काही करावे, असे वाटे.

त्याने जवानांच्या कल्याणासाठी अनेक कार्यक्रम केले. ‘यादें’ सारखा एकपात्री चित्रपट काढण्याचे धाडस केले. हा चित्रपट म्हणजे एक स्वगतच आहे. ‘मुझे जीने दो’ हा त्याचा चित्रपट एका डाकूच्या मानसिक परिवर्तनाबद्दलचा चित्रपट होता. त्याचे लेखन आगा जानी काश्मिरी या अव्वल उर्दू लेखकाने केले होते. ‘रेश्मा और शेरा’ ची पार्श्वभूमी राजस्थानमधील आणि त्या काळात कोणत्याही सोयी-सवलती नसताना, वाळवंटात मुक्काम ठोकून, तंबूत राहून वहिदा, अमिताभ, राखी या कलावंतांकडून सुनीलने उत्तम सहकार्य मिळवले.

करिअरच्या प्रारंभिक काळात सुनील व नर्गिसने अमिताभला मुंबईत आधार दिला. ‘मन का मीत’ या चित्रपटाद्वारे सुनीलने विनोद खन्ना, लीना चंदावरकरना चित्रपटसृष्टीत संधी दिली. प्रेक्षकांच्या दुर्दैवाने सुनीलचा धाकटा भाऊ सोम दत्त हा त्या चित्रपटाचा नायक होता! ‘मन का मीत’ हा सुनीलच्या अजिंठा आर्ट्सचा मसाला चित्रपट. 1969 साली मी तो साताऱ्यात पाहिला होता. रणजीत या अभिनेत्याला सुनीलनेच प्रथम चित्रपटात आणले. देखणा नायक म्हटले की, फक्त देव आनंद किंवा शशी कपूर, धरम यांचा उल्लेख करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. परंतु माझ्या मते, सुनील दत्त हा देवपेक्षाही अधिक रुबाबदार आणि देखणा नट होता. ताडमाड उंची, मुळातच दणकट प्रकृती, घनगंभीर व पहाडी आवाज आणि अत्यंत प्रसन्न नि उमदे व्यक्तिमत्त्व.

सुनीलला साहित्याची उत्तम समज होती. त्याने नर्गिसशी विवाह केल्यानंतर काही दिवस राज कपूरचा देवदास झाला होता. तो आणखीनच दारू प्यायला लागला होता आणि सिगारेटचे चटके स्वतःच्या शरीराला देऊन त्रास करून घेत होता, याचा उल्लेख एका इंग्रजी लेखकानेही केला आहे. परंतु सुनीलने पुढे राज कपूरशी देखील उत्तम संबंध ठेवले. त्याचे कोणाशीही शत्रुत्व नव्हते. तो खराखुरा सेक्युलर होता आणि काँग्रेस पक्षासाठी त्याने खूप काम केले.

संजय दत्तने त्याला प्रचंड मनस्ताप दिला, पण ते सगळे सुनीलने सोसले. पत्नीच्या मृत्यूनंतर देखील न खचता तो काम करत राहिला.. आयुष्यात सुनील दत्तला दोनदा भेटायची संधी मिळाली आणि गप्पाही मारता आल्या. एकदा अंधेरीमधील मरोळ एमआयडीसीत कुठला तरी एक कार्यक्रम होता आणि त्यासाठी प्रमुख पाहुणा म्हणून हॅट व लाल टी शर्ट घालून सुनील आला होता. दुसऱ्यांदा यशवंतराव गडाख यांच्या चिरंजीवांच्या लग्नसोहळ्यात सोनई येथे त्याची गाठ पडली.

जमिनीवर गाद्या, लोडतक्क्या टाकून आम्हा लेखकांची गप्पांची मैफल जमली होती आणि माझ्या शेजारी तो बसला होता. पांढरा शुभ्र कुर्ता आणि पायजमा आणि तेव्हा त्याने देखील सुनीलने मला अनेक गोष्टी सांगितल्या. फाळणीपूर्वी तो आज पाकिस्तानात असलेल्या झेलम येथे राहायचा. त्याचे वडील जमीनदार होते आणि त्याला गावकरी गावात ‘छोटे दिवान’ असे संबोधायचे.

गावात दत्त कुटुंबाला खूप मान होता. पण फाळणीनंतर दत्त कुटुंब स्थलांतरित झाले आणि तेव्हाचा पंजाब प्रांत हा जो भाग आज हरियाणा राज्यात आहे, तेथे ते आले. झेलममधील जी जमीन गेली, त्याच्या बदल्यात हरियाणात जमीन मिळाली. परंतु आर्थिक परिस्थिती बदलली. त्यामुळे शिक्षण आणि करिअरसाठी सुनील मुंबईत आला. इथे त्याने जयहिंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि तो कुर्ला येथे एका मराठी मालकाच्या खोलीत भाड्याने राहू लागला.

शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी काहीतरी केले पाहिजे, म्हणून त्याने ‘बेस्ट’मध्ये शॉप रेकॉर्डरची नोकरी मिळवली. सकाळी साडेसात ते अकरा वाजेपर्यंत तो कॉलेजमध्ये शिकायचा आणि तेथून मग कुलाब्याच्या बस डेपोमध्ये जाऊन नोकरी करायचा. रात्री साडेअकरापर्यंत. त्याचे काम चालायचे आणि तेथून धावतपळत तो बोरीबंदर स्टेशनवर यायचा, कारण तेव्हा शेवटची कुर्ला येथे जाणारी शेवटची लोकल बाराची असे! हळूहळू आकाशवाणीवर तो निवेदन करू लागला हिंदी चित्रपटसृष्टीत ज्यांचा आवाज अतिशय प्रभावी आहे, अशांमध्ये सुनील दत्तचा समावेश होतो.

मात्र एकदा रेडिओसाठी तो दिलीपकुमारची मुलाखत घ्यायला गेला होता, तेव्हा ‘शिकस्त’ या चित्रपटात दिलीप काम करत होता. त्याचे दिग्दर्शन होते रमेश सहगल यांचे. त्यावेळी सुनीलला बघून रमेशजी म्हणाले की, तू सिनेमात का नाही काम करत? त्यांनी लगेच त्याला स्क्रीन टेस्टसाठी बोलावले. त्यावेळी काही संवाद पाठ करून सुनील गेला, पण समोरच्या लाईट्समध्ये त्याला आपल्याला संवाद म्हणत चालत कुठे जायचे आहे, हेच कळेना आणि मग तो तिथून सटकलाच.. आपल्याला सिनेमात काम करणे जमणार नाही, असे त्याला वाटले. परंतु त्याला पुन्हा बोलवण्यात आले आणि मग ‘रेल्वे प्लॅटफॉर्म’ या चित्रपटात त्याला संधी मिळाली.

हे सर्व मला सुनील दत्तच्या तोंडूनच ऐकायला मिळाले. नटांबद्दल आपुलकी असल्यामुळे मी त्यांचा नेहमीच एकेरी उल्लेख करतो. असो. आजही त्याचा हसरा चेहरा समोर येतो… आज सुनील दत्तचा जन्मदिन, म्हणूनच या काही आठवणी.- बाबू मोशाय

साभार;हेमंत देसाई

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT