साहिर लुधियानवी आणि अमृता प्रीतम या दोघात निस्सिम प्रेम होते,साहिर चा अर्थ जादूगर,खरोखर त्याची करेक्टर आणि शायरी सर्व काही जादूगर प्रमाणेच होती
मुंबई
प्रतिनिधि
साहिर या शब्दाचा अर्थ जादूगर. तो शब्दांचा जादूगार होता. अमृता प्रीतम त्याच्याबरोबर कॉलेजमध्ये होती. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. प्रख्यात उर्दू शायर होता तो. ‘प्यासा’मधील गुरुदत्तचे कॅरेक्टर साहिरच्या शायरीवर उभे राहिलेले होते. साहिर मुसलमान आणि अमृता शीख. दोघांच्या प्रेमाला अमृताच्या वडिलांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे साहिरला कॉलेजमधून बाहेर काढण्यात आले.
केवळ वयाच्या बाविसाव्या वर्षी, म्हणजे 1943 साली साहिरच्या कविता ‘तलखियाँ’ पुस्तक रूपात प्रसिद्ध झाल्या. साहिरच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता आणि या गोष्टीचा त्याच्या मनावर खोल परिणाम झाला होता. प्रेमातल्या जखमा सुद्धा त्याने आयुष्यभर सहन केल्या. साहिर लुधियानाहून लाहोरला गेला ते शिक्षणाकरता.
तिथल्या सरकारी कॉलेजमधून त्याने शिक्षण पूर्ण केले. त्याचवेळीआपल्या गझला आणि नजम ऐकवून त्याने लोकांना पागल करण्यास सुरुवात केली. साहिर पुढे पुरोगामी लेखक संघटनेचा सदस्य बनला. उर्दू मासिकांत लिहू लागला. अदबे लतीफ, शाहकार, सवेरा यासारखी उर्दू मासिके सुरू करण्यात आणि त्याच्या संपादनात साहिरचा वाटा होता. साहिरची पुरोगामी व क्रांतिकारक मते बघून पाकिस्तान सरकारने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट काढले होते. 1950 साली साहिर लाहोरहून मुंबईला आला. साहिरने शब्दांना नवे अर्थ दिले आणि त्याच्या गीतांनी संवेदनांना नवीन उंची दिली.
एकदा कैफीने साहिरबद्दल लिहिले होते- ‘साडेपाच फूट का कद जो किसी तरह सिधा किया जाये तो छह फूट का हो जाये. लंबी लंबी लचकीली टांगे, पतली कमर चेहरे पर चेचक के दाग, सरकश नाक, खूबसूरत आँखें, आँखो से झींपा झींपा सा तफक्कुर, बडे बडे बाल, जिस्म पर कमीज, मूडी हुई पतलून और हाथ मे सिगरेट का टिन…’ साहिरचे अतिशय अचूक वर्णन त्याने केले होते.
जावेदचे वडील जाँन निसार अख्तर यांच्याबरोबर तो साहिरकडे लहानपणापासून जात असे. पुढे जावेदची त्याच्याशी दोस्तीच झाली. उद्या साहिरवर सिनेमा लिहायचा झाल्यास, माझ्याइतका दुसरा माणूस तो चांगल्या प्रकारे लिहू शकणार नाही, असे जावेद म्हणाला होता. जावेदने हा सिनेमाला लिहायलाच पाहिजे! आम्ही सर्वजण त्याची वाट बघत आहोत..
साहिरची सुरेख गाणी इतकी आहेत की, त्या सगळ्यांचा उल्लेख केवळ अशक्यच आहे! ‘त्रिशूल’ मधले ‘मोहब्बत बडे काम की चीज है’ हे त्याचे गीत माझे खूप आवडते आहे. त्यामधील ‘किताबों में छपते है चाहत के किस्से हकीकत की दुनिया में चाहत नहींं है’ यातला कडवटपणा मनाला भिडणारा आहे.
साहिर तुम्हाला खेचून घेतो, विद्ध करतो, आपल्या धारदार शब्दांनी वादळात घेऊन जातो. त्याच्या प्रतिमा आणि शब्द इतरांपेक्षा नेहमीच वेगळे असतात. त्यामुळे त्याला ‘पल दो पल का शायर’ असे आपण म्हणू शकणार नाही. आपल्या मृत्यूनंतर चाळीस वर्षांनीही त्याचे प्रत्येक गीत आपल्या मनात साचून राहिलेले असते. आज साहिरची त्रेचाळिसावी पुण्यतिथी. त्याला आदरांजली.
साभार- हेमंत देसाई